अनेकशक्तिसंघट्ट प्रकाशलहरी घन: I
ध्वान्तध्वंसो विजयते विद्याशंकरभारती II
श्रीमद् शंकराचार्य भगवान यांनी दक्षिणेच्या श्रुंगगिरीपुर (श्रुंगेरी) या पीठावर श्री. प. सुरेश्वराचार्य स्वामी यांना बसविले, या परंपरेतील ३३ वे पीठाधीश श्री. प. विद्यासंकरभारती स्वामी (देवगोसावी) यांच्या वेळची गोष्ट.
श्रीमदाद्यशंकराचार्यांनी आपल्या अवतार समाप्तीच्या वेळी ज्या हिमालयीन गुहेत प्रवेश केला, ती गुहा पाहण्यासाठी श्री. प. विद्याशंकरभारती (गुरुस्वामी) आपल्या शिस्यांसह गेले होते. “सहा महिन्यांपर्यंत जर मी गुहेतून बाहेर आलो नाही, तर तुमच्यापैकी एकाने श्रुंगेरीपीठ चालवावे “ असा आदेश देऊन त्यांनी गुहेत प्रवेश केला. शिष्य सहा महिने दारातच थांबले. अखेर सहा महिन्यांनंतर माघारी परतून गुर्वाज्ञेप्रमाणे सर्व केले.
काही दिवसांनी गुरुस्वामी बाहेर आले, तो गुहेच्या दारात कोणीच नव्हते. गुरुस्वामी संचार करीत संकेश्वरास आले व वल्लभगडावर मुक्काम करून, पूर्वेस निर्जन वनात हरिद्रादेवीची उपासना करीत राहिले.
यावेळी कोल्हापुरात सोमवंशीय कृष्णराय राजाचे राज्य होते. याने गुरुस्वमींचा अधिकार जाणून घेतला, यांना “दक्षिण काशी करवीरामध्ये” मठ स्थापन करून राहण्याची प्रार्थना केली. गुरुस्वामींना करवीरनिवासिनी महालक्ष्मीनेही तसा स्वप्नादेश दिला. त्यानुसार कृष्णरायांची विनंती मान्य करून शृंगेरी पीठाधिपती श्री. प. विद्याशंकरभारती स्वामींनी पंचगंगातीरावर करवीर पीठाची स्थापना केली.
अशाप्रकारे इ. स. १५७९ मध्ये (१६ वे शतक) कोल्हापुरात प्रत्यक्ष आद्यशंकराचार्यांनी स्थापन केलेल्या शृंगेरी पीठाच्या शुद्ध परंपरेतील पीठाची प्रतिष्ठापना झाली. हे महाराष्ट्रातील एकमेव आचार्यपीठ आहे.