करवीर पीठ हेच महाराष्ट्रातील एकमेव व मुख्य पीठ असून ते शृंगेरी पीठाधीपतींनी स्थापन केले आहे. असा निष्कर्ष या पीठाच्या प्राचीन माहितीवरून प्रामुख्याने निघतो.
शृंगेरी पीठाच्या ३३ व्या धर्म पीठाधीपतींनी कोल्हापूरच्या करवीर पीठाची स्थापना सन १५७९ मध्ये, म्हणजेच इ. सनाच्या १६ व्या शतकात केली, असे उल्लेख श्री मारुलकर स्वामी लिखित, करवीर पीठाचा इतिहास या ग्रंथात आढळतात.
पुढे करवीर पीठाधीपती श्री विद्याशंकरभारती (देवगोसावी) यांनी संकेश्वारचे प्राचीन मंदिर व त्यांच्या जवळून वाहणारी हिरण्यकेशी नदी पाहून तेथे एक मठ बांधला तोच, “संकेश्वाराचा मठ” म्हणून प्रसिद्ध आहे.
तेव्हापासून करवीर पीठाधीशांचे वास्तव्य क्वचितप्रसंगी संकेश्वार मठात होत असावे. इ. सन १७६६ साली कोन्हेरराव पटवर्धनांनी करवीर मठात करवीर पीठाधीशांचे वास्तव्य असे. पुढे करवीर पीठाधीपती ब्रह्मनाळकर स्वामी पुन्हा करवीरात कायम वास्तव्यास आले आणि करवीर पीठाचे कार्य पुन्हा सुरु झाले.
करवीर पीठाच्या परंपरेप्रमाणे येथील पीठाधीपती स्वामींची श्री. विद्याशंकरभारती व श्री. विद्यानृसिंहभारती अशी दोनच नावे क्रमाने चालत आलेली आहेत. बिरुदावालीतील व शिक्क्याच्या श्लोकातही या नावापूर्वी दुसरे कोणतेही उपपद लावलेले नाही.