श्रीमत् जगद्गुरू विद्याशंकरभारती स्वामी करवीर पीठ हे वयोमानानुसार निवृत्त झाले आणि या पीठाचे नूतन शंकराचार्य म्हणून श्री. यशवंत काशिनाथ कुलकर्णी, शिरटीकर यांची निवड गुरुशिष्य परंपरेनुसार विद्यमान जगद्गुरू श्रीविद्याशंकरभारती स्वामी यांनी केली आहे. ते आता या पीठासनावर श्रीविद्यानृसिंहभारती या नावाने शंकराचार्य म्हणून कार्यरत आहेत.
श्री शंकराचार्य पीठ करवीर – नूतन पीठाधीश – श्रीविद्यानृसिंहभारती यांचा जीवन परिचय

“धर्म एव हतो हन्ति-धर्मो रक्षति रक्षित:” तुम्ही तुमचा धर्म सोडला तर तुमचा विनाश अटळ आहे. तुम्ही जर धर्माचे रक्षण प्राणपणाने केले तर धर्म तुमचे रक्षण करेल. प्रत्येक भारतीयाने, आपले जीवन वरील सूत्रानुसार व्यतित करावे व धर्म “तेजस्वी” करावा अशी अपेक्षा आहे. परंतु सनातन हिंदु धर्माचे तत्वज्ञान हे केवळ शाब्दिक ज्ञान नसून “आचार: प्रभावो धर्म:” या सूत्रानुसार प्रत्येक व्यक्तीने आपले आचारविचार, कुळाचार यांचे धर्मास अनुसरून आचरण करावे, समाजाच्या सामुदायिक पद्धती पुन्हा प्रस्थापित करणे व धर्माची तेजस्वी परंपरा पुन्हा निर्माण करणे, किंबहूना हिंदू धर्माचे “संरक्षक कवच” म्हणून काम करणे याच उद्दिष्टासाठी आद्य शंकराचार्य यांनी मठाची स्थापना केली आहे. पीठासीन झाल्यावर हेच ध्येय डोळ्यासमोर धरून अखंड प्रयत्नशील राहणार आहोते, असे प्रेरणादायक विचार, जगद्गुरू शंकराचार्य. करवीर पिठारूढ शंकराचार्य श्री श्रीविद्यानृसिंहभारती यांनी व्यक्त केले.
प. श्री श्रीविद्यानृसिंहभारती यांचे मूळ नाव “यशवंत काशिनाथ कुलकर्णी-शिरटीकर” असे आहे. दिनांक ६ एप्रिल १९५१ रोजी त्यांचा जन्म झाला. शिरोळ तालुक्यातील शिरटी हे त्यांचे मूळ गाव. त्यांचे लौकिक शिक्षण प्रथम वर्ष विज्ञान (एफ. वाय. सायन्स) व नंतर “बी. फार्मा” झाले आहे. इचलकरंजी येथे त्यांचे वास्तव्य होते. १९७८ साली ते विवाहित झाले. त्यांचे संसारिक जीवन पूर्णावस्थेपर्यंत पोहोचले आहे.
मिरज येथील कै. हरिकाका आळतेकर हे श्रीमत् भागवत ग्रंथाचे थोर उपासक. त्यांना भागवत संहिता मुखोद्गत होती. कै. हरिकाका हे मिरजेत त्यांच्याकडील वारंवार होणाऱ्या वास्तव्यामुळे, भागवत आणि अन्य ग्रंथांचे वाचन व वेदांचे अध्ययनाची अप्पांना गोडी लागली. या ओढीतूनच आप्पांनी इचलकरंजीचे वेद्साम्रात पाध्येगुरुजी यांचेकडे व वेदमूर्ती श्री. अ. द. कात्रेगुरुजी यांचेकडे आवश्यक ते वेदाध्ययन केले. याच काळात (वय वर्षे १५ ते २०) ते टिळक महाराष्ट्र विद्यापीठाची संकृतची “भाषाभिज्ञ” पर्यंत परीक्षाही उत्तीर्ण झाले.
कृपाछत्र – पूज्य ब्र. यती महाराज :
आप्पाचे जीवनात गृहस्थाश्रमातून संन्यास मार्गाकडे जाण्याचे परिवर्तन घडून आले. त्याचा प्रारंभ श्री यती महाराज उर्फ नारायणानंद सरस्वती यांच्या सानिध्यामुळे घडले. श्री यती महाराज ही ब्रह्मचारी होते. १९६७ मध्ये त्यांनी गरुडेश्वर येथे संन्यास धारण केला. ते स्वतः श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ व गाणपत्य होते.