कृपाछत्र – पूज्य ब्र. यती महाराज
आप्पांचे जीवनात गृहस्थाश्रमातून संन्यास मार्गाकडे जाण्याचे परिवर्तन घडून आले. त्याचा प्रारंभ श्री यती महाराज उर्फ नारायणानंद सरस्वती यांच्या सानिध्यामुळे घडले. श्री यती महाराज ही ब्रह्मचारी होते. १९६७ मध्ये त्यांनी गरुडेश्वर येथे संन्यास धारण केला. ते स्वतः श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ व गाणपत्य होते. श्री यती महाराजांनी दोन वेळा गायत्री पुरश्चचरणे केली होती. श्रीगणपती अथर्वशीर्षाची लक्षावधी आवर्तने केली. आणि “मंगलमूर्ते विघ्नहरा-दुरितनाशन कृपा करा!” हा मंत्र सिद्ध केला होता. श्री यती महाराजांना कांची कामकोटीचे परमाचार्य पूज्य चंद्रशेखरसरस्वती स्वामी यांचा आशीर्वाद लाभला होता. श्री यती महाराजांचे कठोर तपश्चर्येमुळे त्यांना श्रीगणपतीचे सगुण दर्शनही घडले होते. श्री यती महाराज यांना प्रस्थानत्रयी (म्हणजे आदी शंकराचार्यांचे १. सूत्रभाष्य २. दशोपनिषदे ३. गीता भाष्य ही तीन ग्रंथ) मुखोद्गत होते व प्रस्थानत्रयीवर त्यांचे सखोल चिंतानही झाले होते.
सिद्धयोगी यती महाराजांचे दर्शन आप्पांना घडले व ते श्री यती महाराजांच्या जीवनाकडे आकृष्ट झाले. १९७७ सालापासून श्री आप्पानी यती महाराजांकडे प्रस्थानत्रयीचाअभ्यास केला. त्याचप्रमाणे संन्यास घेण्याचा विधी, संन्यासधर्म, आचरण त्यांचे आहारविहार यांचा आप्पांनी अभ्यास केला. पूज्य श्री याति महाराज यांना निसर्गाची फार आवड होती. श्री आप्पांनी याति महाराजांचे बरोबर अनेक घनदाट जंगलातून प्रवास व निवास केला. “भोवतालच्या रम्य निसर्गामध्ये परमेश्वराचे दर्शन कसे घ्यावे, याचे ज्ञान यती महाराजांच्या सहवासात मला लाभले” असे आप्पा सांगतात.
१९८१ पासून श्री आप्पांनी, श्री याति महाराजांकडे उपनिषदांचा अभ्यास केला. करवीर पीठावरील विद्यमान शंकराचार्य पूज्य श्री विद्याशंकरभारती स्वामी यांची निवडही श्री यती महाराजांनीच केली होती व त्यांचे पीठाधीश या नात्याने आवश्यक ते अध्ययन कोल्हापूर मठात राहून यती महाराजांनी करून घेतले. त्यावेळी आपले वास्तव्यही मठात असल्याने आचार्य पदाचे शिक्षण व शास्त्र यांचे ज्ञान मला विनासायास घडले, असे आप्पा सांगतात. १९८९ साली श्री यती महाराज यांनी शी आप्पांना मंत्रदीक्षा देऊन अनुग्रहीत केले आहे.