कोल्हापूर येथे श्रीमत् जगद्गुरू शंकराचार्य, करवीर पीठ हा सुमारे ५०० वर्षांपूर्वीची परंपरा असलेला एक पुरातन मठ आहे. हा मठ (पीठ) छत्रपतींच्या राजाश्रयावर चालत होता. मराठे राजेराजवाड्यांकडून जमीन व गांवे इनाम मिळाली आहेत. मिळणाऱ्या उत्पन्नावर धर्मप्रचारादी कार्ये होत होती.
काळ बदलला, स्वातंत्र्य मिळाले. त्यानंतर सर्वच बाजूनी शासकीय निर्वंध पडू लागले. नवनवीन कायदे झाले आणि मिळणाऱ्या उत्पन्नात घट होऊ लागली. बाजारभाव वाढत गेले. परंतु पिठास मिळणाऱ्या शेतीचे उत्पादनात वाढ होऊ शकली नाही. काही ठिकाणी तर उत्पन्न येणेच बंद झाले. शासनकर्त्यांचेही या गोष्टीकडे दुर्लक्ष झाले.
या सर्व घटनांमुळे मठाची पुरातन इमारत नवीन बांधणे तर दूरच राहो, असलेल्या इमारतींचीही निगा राखणे मुश्किलीचे झाले. त्यामुळे इमारत दुरुस्ती, नूतनीकरण, गोशाळा, अन्नदान आदी आवश्यक गोष्टींकडे लक्ष देणे अशक्यच झाले. मग दवाखाने, वाचनालय आदी लोकोपयोगी योजनांचा विचारसुद्धा करणे अवघड वाटू लागले.
या सर्व गोष्टी होणेसाठी लोकाश्रयाची आवश्यकता आहे.
पीठाधिपती श्री. प. प. विद्याशंकरभारती स्वामी जगद्गुरू शंकराचार्य पीठ करवीर यांनी सातत्याने संपूर्ण महाराष्ट्रात संचार करून, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील व महाराष्ट्राबाहेर सामान्य जनतेस अध्यात्माची खरी ओळख करून दिली असून, पीठाचे नाव उज्ज्वल केले आहे.
संपूर्ण महाराष्ट्रात आद्य शंकराचार्य परंपरेतील हा एकच मठ आहे.