“भवो ही लोकाभ्युदयाय तादृशाम्” या कोटीतील जे वैदिक धर्मोद्धारक महात्मे असतात, सर्वस्वी त्यांच्या महात्म्यावरच मानवांचा ऐहिकामुष्मीक अभ्युदय अवलंबून असतो. अशा तऱ्हेने महात्म्य अपरोक्ष आत्मसाक्षात्काराने प्राप्त होते. कारण आध्यात्मज्ञानाइतके शाश्वत, पवित्र व सर्वश्रेष्ठ असे दुसरे कोणतेही ज्ञान नाही. भगवान श्रीकृष्णानेही “आध्यात्मविद्या विद्यानाम्” असा गीतेत या विद्येच्या सर्वश्रेष्ठत्वाचा उल्लेख केला आहे.
ज्ञानेश्वर, तुकाराम, रामदास यांसारख्या साक्षात्कारी संतांनीही याच आत्मविद्येचा प्रसार केला. या आध्यात्मज्ञानाची ज्योती प्रदीप्त करून, ज्यांनी ती अखंड तेवत ठेवली, त्या श्रीमत् आद्य शंकराचार्य यांचे या जगतावरचे ऋणकधीही न फिटणारे आहे.
भारतात आजपर्यंत जे कोणासही साध्य झाले नाही, असे धार्मिक सार्वभौमत्व आचार्यांनी आपल्या सामर्थ्याने बुद्धीबळाने व तेजस्वितेने सर्वत्र स्थापन केले. परस्परांतील वैमनस्य आणि दुहीने कायमचे वैरी झालेले देश, सनातन वैदिक धर्माच्या एकछत्री अंमलाखाली आणले. म्हणूनच त्यांना “जगद्गुरू” ही संज्ञा यथार्थपणे लागू पडते. आचार्यांनी ही परंपरा पुढच्या कालखंडात साऱ्या संत मंडळींनी सुलभ केली. युगपुरुष छत्रपती श्री शिवाजी महाराजांनीही वैदिक धर्मोद्धार करून त्यास राजकीय स्थैर्य आणले.
श्रीमत् आचार्यांनी हा आत्मविद्येचा पवित्रम संप्रदाय अविच्छिन्न रहावा, वैदिक धर्मोपदेशाचा साऱ्यांना लाभ मिळावा म्हणून, भारतात चार दिशेला पीठे स्थापन करून ती धर्मसंबंधाने जोडली. या चार पिठांचे ठिकाणी विविध वेदांचे अध्ययन व अध्यापन होऊ लागले. दक्षिणेस श्रुंगेरी पीठ (ऋग्वेद), पश्चिमेस द्वारका पीठ (यजुर्वेद), पूर्वेस जगन्नाथपुरी पीठ (कृष्णयजुर्वेद), उत्तरेस बद्रीनारायण (सामवेद व अथर्ववेद); प्रत्येक पीठासाठी त्यांनी चार अधिकारी शिष्यांची निवड केली व पुढे या चारही पिठांच्या काही शाखा-उपपीठे, त्या त्या पिथाधीशांच्या हातून स्थापन झाली. त्यामुळे हा संप्रदाय सर्व भरतखंडात अव्याहत सुरु आहे.